नाशिक प्रतिनिधी
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असताना, या तीन अल्पवयीन मातांनी अपत्यांना जन्म दिल्याची बाब समोर आली आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात बालविवाहाचा कायदा लागू असताना, ग्रामीण भागातून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी अपत्यांना जन्म देत या कायद्याच्या तकलादू अंमलबजावणीलाच हरताळ फासला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाचा महिलांच्या प्रसुती वॉर्डमध्ये गेल्या रविवारी (ता.१९) अवघ्या १३ वर्षे ११ महिने व १७ दिवस वय असलेली अल्पवयीन गर्भवती मुलीला प्रसुतीसाठी तिच्या आईने दाखल केले होते. गेल्या सोमवारी (ता.२०) मध्यरात्री तिची प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला. सदरील अल्पवयीन मुलगी ही निफाड तालुक्यातील आहे.दुसरी अल्पवयीन गर्भवती मुलगी ही १७ वर्षे ११ महिने ९ दिवस वय असलेली असून, ती पेठ तालुक्यातील आहे. तिच्या आईने तिला गेल्या १३ नोव्हेंबर रोजी प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या १६ तारखेला या अल्पवयीन गर्भवती मुलीने मुलाला जन्म दिला आहे.तर, तिसरी मुलगी ही चांदवड तालुक्यातील असून, तिचे १६ वर्षे ५ महिने व २० दिवस वय आहे. या अल्पवयीन गर्भवती मुलीची गेल्या १३ नोेव्हेंबर रोजी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला आहे.परंतु जन्मत:च तिचे वजन कमी असल्याने चांदवड उपजिल्हारुग्णालयातून अधिक उपचारासाठी तिच्या आईने या अल्ववयीन मुलीला नवजात बाळासह गेल्या १५ तारखेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या तीनही प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीमध्ये माहिती कळविण्यात आली आहे. त्याप्रमाणे निफाड, पेठ आणि चांदवड पोलीस ठाण्यांना यासंदर्भातील माहिती पोलीसांनी कळविली आहे.कायद्याचीच एैसीतैसीअल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी कडक कायदे करण्यात आलेले आहे. असे असतानाही बालविवाह रोखण्यात शासनाला अपयश आलेले आहे.तसेच, अल्पवयीन माता रोखण्यातही कायद्याच्या कठोर अंमलबजावणी अभावी अपयशच आल्याचे या तीन घटनांवरून स्पष्ट होते आहे. याबाबत पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष आहे. मात्र, कोवळ्या कळ्या उमलण्यापूर्वीच त्यांच्यांवर मातृत्वाचे ओझे येत असल्याचे भीषण सामाजिक वास्तव समोर आले आहे.