धुळे प्रतिनिधी
भाचा सारखा रडत असल्याने मामाचे डोके दुखू लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या मामाने आपल्या चार वर्षीय भाच्याला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून ठार केल्याची ह्रदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी धुळे शहरातील फिरदोसनगर, रातराणी चौक येथे घडली. मोहंमद हाजिक एजात हुसेन (वय ४ वर्षे) असे मयत भाच्याचे नाव आहे. तर नुरूल अमीन नईम अहमद (वय २२, रा.रातराणी चौक,धुळे) असे आरोपी मामाचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील फिरदोस नगरातील रातराणी चौकात राहणारी मरियम बी एजाज हुसेन (वय २८) ही महिला आपल्या आई-वडिलांकडे गेली होती. त्यावेळी मामा-भाचे खेळत होते. मात्र चार वर्षाचा मोहंमद हाजिक एजात हुसेन हा रडू लागल्याने, त्याचा त्रास नुरूल अमीन याला झाला. भाच्याच्या सारख्या रडण्यामुळे नुरूच अमीनचे डोके दुखायला लागले. संतापाच्या भरात त्याने मोहंमद हाजिक याला जवळच असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून ठार मारले. याप्रकरणी मरीयम बी अजाज हुसेन हिने चाळीसगावरोड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नुरूल अमिन नईम अहमद (वय २२) याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक धीरज महाजन करीत आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी भेट दिली.