नाशिक प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे नाशिकध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे. या नुकासीची पाहाणी करण्यासाठी छगन भुजबळांचा गुरुवारी दौरा होत आहे. मात्र या दौऱ्याला गावांमधून त्यांना विरोध होतोय. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये एक मराठा बांधव भुजबळांना गावात न येण्याचं आवाहन करताना ऐकू येत आहे. त्यावर भुजबळ म्हणतात, तुम्ही चार लोक म्हणजे गाव नाही. मी येणार आणि ज्यांना मला भेटायचं आहे त्यांना मी भेटणार. त्यानंतर भुजबळांनी पाहाणी दौरा करणार असल्याचं स्पष्ट केलंय. गावांमधून होणाऱ्या विरोधानंतर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रियादेखील आलीय. त्यात ते म्हणतात, ९९ टक्के मराठा माझ्याबरोबर आहेत. एखादा मेसेज येतो आणि गावात येऊ नको म्हणतो.. परंतु मी जाणार. ज्यांना मला भेटाचंय ते भेटतील ज्यांना भेटायचं नाही ते भेटणार नाहीत. भुजबळ पुढे म्हणाले, मला कुणीही गावबंदी करु शकणार नाही. तसं कुणी केलं तर त्याला एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. कुणी काहीही मेसेज फिरवले तरी मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. असं म्हणत त्यांनी दौऱ्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.