नाशिक प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी स्थापन झालेल्या राज्य आणि जिल्हा स्तरीय समितीत साधू महंतांना स्थान न मिळाल्याने साधू महंतांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात साधू महंतांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना आपल्या भावना कळविल्या आहेत.अलिकडेच स्थापन झालेल्या राज्यस्तरीय कुंभमेळा नियोजन समितीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा तर जिल्हा स्तरीय समितीवर अध्यक्ष म्हणून ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पालक मंत्री दादा भुसे आणि अन्न पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना केवळ सदस्य म्हणून दुय्यम स्थान दिल्याची चर्चा असताना समितीवर स्थान न मिळाल्याने साधू महंतांमध्येही असंतोष पसरला आहे कुंभमेळा अवघ्या तीन वर्षावर आला असताना काहीशा उशिराने का होईना राज्य स्तरीय शिखर समिती, शासनाकडून स्थापन झाल्या आहेत. परंतु ज्यांच्यासाठी कुंभमेळा भरवला जातो त्या साधू महंतांचे प्रतिनिधीच समितीत नसल्याने प्रारंभीच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष साधूंना वेधावे लागले.आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज व नाशिकचे महंत भक्त चरणदास यांच्यात या मुद्द्यावर मंथन होऊन त्रंबकेश्वरचे शंकरानंद सरस्वती यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनद्वारे आपल्या संतप्त भावना कळविल्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर विचार करणार असल्याचे आश्वासन महंतांना दिले. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आयुक्तांनाही निवेदन देऊन भावना कळविणार असल्याचे महंतांनी सांगितले.कुंभमेळा समितीत साधूंना स्थान नसल्याने राजकीय कार्यकर्त्यांनीच हा कुंभमेळा भरवावा असा टोमणा साधुंनी संताप व्यक्त करीत लगावला भारतभरातील आखाड्यांची मुख्य संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महाराज यांनी याबाबत उच्च स्तरावर लक्ष वेधू असे सांगितले.नील पर्वत वरील महंत महेंद्र गिरी, तसेच अटल आखाड्याचे महंत उदयगिरी, महामंडलेश्वर सोमेश्वरनंद महाराज, धनंजय गिरी महाराज (पंचायती निरंजन आखाड्या) सर्व साधूंकडून शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान त्रंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीया देवचके यांचा त्र्यंबकचे प्रतिनिधी म्हणून कुंभमेळा जिल्हास्तरीय समितीत समावेश आहे. शिखर समिती मध्ये पुरोहितांचे प्रतिनिधी आहेत. मात्र साधू नाहीत अशी खंत व्यक्त करण्यात आली.