जळगाव प्रतिनिधी
आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या दौऱ्यात आणि सभांमध्ये चो-या करणा-या मालेगावच्या सहा जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. अकबर कबुतर मेाहंमद उस्मान (रा. मालदा शिवार, मालेगाव) याच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. नदीम अख्तर अहमद, अबरार अहमद मेाहंमद रऊफ, हमीद अली मेाहंमद उमर व बेरकद दाऊद हबा अब्दुल खेमान (सर्व रा. मालेगाव) ही या चोरांची नावे आहे. या चोरां कडून आठ मेाबाईल व १ लाख ७९ हजार रुपये रेाख तसेच चोरलेली पाकिटे जप्त केली आहेत. या अगोदर जालन्याच्या सभेत एक कोटी रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भुसावळ पोलिसांनी या लुटारूंच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. पुढाऱ्यांच्या वेशात ही लुटारूंची टोळी वावरत असल्याचेही समोर आले आहे. कुऱ्हे पानाचे येथील एका पाकीट चोरीच्या घटनेचा तपास करीत असताना सीसीटीव्हीच्या कैद झालेल्या एका चोरट्याच्या छाया चित्रावरून या घटनेचा उलगडा केला. जरांगे यांच्या वाहनांचा ताफा जामनेरहून भुसावळकडे येत होती. कुऱ्हे पानाचे येथे जरांगे यांच्या सत्कारासाठी हा ताफा थांबला. या ताफ्यात असलेल्या एका वाहनातून पाच जण खाली उतरले. गर्दीतील लेाकांची पाकिटे त्यांनी चोरली. एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडचे पैसे लुटले. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हे पानातील सीसीटीव्हीची तपासणी केली. तेथे एक अनोळखी संशयित दिसला. त्याचे छायाचित्र तयार करून ठिकठिकाणी पाठवले. तो मालेगाव येथील गुन्हेगार असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कुंडलीच बाहेर काढली.