दिंडोरी प्रतिनिधी
निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार व सीसीटीव्ही फुटेज दिल्यावरून वाद घालत चार संशयितांनी एका तरुणावर कोयता व लोखंडी राॅडने हल्ला केला सुधाकर ऊर्फ विशाल यशवंत वारुळे (रा. मोदकेश्वर सदन, कलानगर, दिंडोरी रोड, नाशिक) राशेगाव (ता. दिंडोरी) गावाकडून नाशिकला दुचाकीवरून जात असता, संतोष ऊर्फ नंदू शंकर साळवे (रा. गंगापूर रोड, नाशिक), राजाराम ऊर्फ राजू भिमाजी अपसुंदे, बालाजी साहेबराव पवार, शंकर पांडुरंग बेंडकुळे यांनी दुचाकी आडवी लावून वारुळे यांची वाट अडविली व आमच्या विरोधात ११२ ला फोन का केला? निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार व सीसीटीव्ही फुटेज का दिले, अशी विचारणा करून जिवे मारण्याची धमकी दिली. संशयितांनी कोयत्याने वार केले व लोखंडी राॕडने हल्ला केला. एका संशयिताने गुप्तांगावर लाथ मारली. याबाबत वारुळे यांनी फिर्याद दिल्यावरून दिंडोरी पोलिसांत चार संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे तपास करीत आहेत.