नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात गोवा राज्यातील विदेशी मद्य साठयाच्या अवैध होत असलेल्या वाहतुकी विरोधात जोरदारपणे कारवाई सुरू असून सलग तिसरा छापा टाकून प्रकाशा येथे सुमारे 30 लाख रुपयांचा मद्य साठा पकडण्यात आला. तळोदा, अक्कलकुवा पाठोपाठ प्रकाशा भागात पकडलेला साठा मिळून एकंदरीत अर्धा कोटीहून अधिक रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात दिनांक पाच डिसेंबर 2023 रोजी रात्री भरारी पथकाने कारवाई करून 25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. लगेच सहा डिसेंबर 2023 रोजी रात्री अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात मुंबईतील भरारी पथकाने छापेमारी करून 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने देखील दिनांक ०७/१२/२०२३ रोजी प्रकाशा अक्कलकुवा रस्त्या लगत, प्रकाशा शिवार, प्रकाशा ता. शहादा जि. नंदुरबार या ठिकाणी वाहनतपासणी सापळा रचुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतीबंधीत असलेला गोवा राज्यातील मद्य साठा जप्त केला. गोवा राज्यात निर्मीत विदेशी मद्य ३०० बॉक्स, महिंद्रा बोलेरो मॅक्स पीकअप असा ३० लाख ६७ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल आहे. सदरची कारवाई डॉ.श्री. बा.ह. तडवी, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक तसेच स्नेहा सराफ, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए.जी. सराफ, व्ही.बी.पाटील, जवान सर्वश्री भाऊसाहेब घुले, धनराज पवार, महेश सातपुते, यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास व्ही. बी. पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहेत. या प्रकरणी सागर शांतीलाल सैंदाणे (वाहनचालक), वय २८ वर्षे, राहणार संत गाडगेनगर, बोराडी, ता. शिरपुर, जि.धुळे, कमलेश सुभाष पाटील, राहणार मु.पो. बोराडी ता. शिरपुर जि.धुळे (फरार) मद्य पुरवठा दार, विणा (पुर्ण नाव माहित नाही) (फरार) सदर वाहन क्र. MH. 18. BZ 0851 चे मालक व संशयीत अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.